दिंडी किंवा
वारी या शब्दांबरोबर पंढरी हे नाव शेकडो वर्षांपासून जोडले गेले आहे. दिंडी हि
कधीपासून सुरु झाली? कोणी सुरु केली? का सुरु केली? ईश्वर जळी, स्थळी, पाषाणी
ओतप्रोत भरला आहे असे सांगणाऱ्या संतांनी दिंडी का चालू केली असावी? संत तुकाराम,
ज्ञानेश्वर हि संत मंडळी दिंडीमध्ये नेमके काय करत असतील? दिंडीमधील त्यांची
दिनचर्या काय असेल? दिंडी शेकडो वर्षे अविरतपणे चालू राहते यामागे कारण काय? असे
अनेक प्रश्न विचार करायला लावतात.
दिंडी म्हटले
कि आपल्यासमोर येते भली मोठी गर्दी! टाळ, मृदंग, वीणा आणि पताका घेऊन ताला-सुरात
भजन गात पायी जाणारा भला मोठा जन-समूह! पांडुरंग हे संपूर्ण महाराष्ट्राचे अत्यंत
लाडके दैवत. त्याला भेटण्यासाठी लाखो भाविक शेकडो मैलाचा प्रवास पायी करतात.
ज्या संतानी दिंडी
किंवा वारी चालू केली ते सर्व युवक होते. समाजाला जागृत करण्यासाठी, सशक्त, श्रद्धावान,
धैर्यवान, असे युवक घडविण्यासाठी, भक्ती हि संकल्पना समजून देण्यासाठी, एकमेकांना
भेटून विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी, त्यांनी दिंडी हे माध्यम निवडले. पुढील
पिढीसाठी काहीतरी सशक्त पर्याय राहावा म्हणून दिंडी हि परंपरा त्यांनी चालू ठेवली.
त्यामुळेच शेकडो वर्षांपासून दिंडी आजहि यशस्वीपणे चालू आहे.
त्या काळात
दळण-वळणाची साधने वेगळी होती. प्रवासाचे सर्वात सोपे साधन म्हणजे पायी चालणे! पायी
चालण्यासाठी सर्वात महत्वाचे असते शारीरिक सामर्थ्य! सशक्त शरीर हे अध्यात्मासाठी
अत्यंत महत्वाचे आहे हा संदेश नकळत संतानी समाज मनावर बिम्बविला. पायी चालण्यामुळे
शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक पातळीवर संतुलन आपोआप साधले जाते.
सर्वांना सोयीस्कर व युवकांना आकर्षित करणारी वारी समाजातील सर्व थरांमध्ये
लोकप्रिय ठरली.
१५ ते २५ हे
मानवी आयुष्यातील अत्यंत महत्वाचे वय आहे. नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई,
यांसारख्या युवकांनी ऐन तारुण्यातच परमेश्वर समजून घेतला व काव्य, लिखाण केले. त्यामुळे
त्यांचे विचार हे तरुणांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, संत साहित्य हे उतारवयात
वाचण्यासाठी नाही हे समजणे अत्यंत महत्वाचे आहे. गाथा, ज्ञानेश्वरी व संत साहित्य
ऐन तारुण्यात समजणे महत्वाचे आहे. त्यासाठी ऑडीओ-विज्युअल माध्यमाद्वारे संतांचे
विचार युवकांपर्यंत पोहचविण्याचे काम युवा दिंडी करत आहे. प्रवासा दरम्यान शाळा,
महाविद्यालय यांना भेट देऊन युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. युवकांकडून युवकांना
जागृत करण्याचे काम या प्रवासातून होणार आहे.
प्रवासाचे आजचे
सोयीस्कर माध्यम म्हणून व साहसी प्रवासाचा अनुभव यावा म्हणून मोटार सायकल चा
प्रवास निवडला आहे. प्रवासा दरम्यान राहण्याची व्यवस्था तंबू मध्ये करण्यात येणार आहे.
युवा दिंडी चा प्रवास हा थोडासा खडतर असला, तरी जीवनाला नवी दिशा देणारा आहे.