Thursday, October 9, 2014

युवक व पर्यटन.

युवक, पर्यटन व करिअर!

एके दिवशी माझ्या मनात विचार आला कि संपूर्ण भारतातल्या विविध शाळा, महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्याबरोबर संवाद करायचा, त्यांना समाजसेवेसाठी प्रेरित करायचे, आणि खरा भारत समजून घ्याचा. त्यासाठी मी भारतातील खेडे आणि महाविद्यालयांना भेट देण्याचे ठरविले. कारण जगातील सर्वात जास्त युवक भारतात आहे आणि ते मला महाविद्यालयात भेटणार होते, खेड्यांना भेट देण्याचे कारण असे कि भारतातील सर्वात जास्त लोक खेडेगावात राहतात. मी हा प्रवास बाईकवरून करायचे ठरविले. पण मला माझ्या घरून बाईक मिळाली नाही, उलट  प्रचंड विरोध झाला. माझ्याकडे तर पुरेसे पैसे सुद्धा नव्हते. मी माझ्या अनेक मित्रांना बाईक देण्यासाठी  विनंती केली, पण कोणीही दिली नाही. शेवटी बाईकवरून जाण्याचे रद्द  होते कि काय असे वाटू लागले, पण मी माझ्या विचारावर ठाम होतो. एके दिवशी माझ्या मित्राचा पुण्याहून फोन आला,  मी त्यावेळी चेन्नई ला होतो. बाईक नसल्यामुळे यात्रा रद्द होण्याची चिंन्हे आहेत असे मी त्याला सांगितले. तो म्हणाला मी बाईक देतो. मी फोन खाली ठेवला, तत्काळ मधून रेल्वे चे टिकेट काढले, पुण्याला आलो, त्याच्या घरी जाऊन बाईक घेतली,  ५०० रु एका मित्राकडून उसने घेतले आणि निघालो. कसलेही प्लानिंग नव्हते, तयारी  नव्हती, पैसे नव्हते, तरीही प्रवासाला सुरवात केली. माझ्या आणखी काही मित्रांना माझ्या भारत यात्रेविषयी समजले आणि त्यांनी एकत्र येऊन संपूर्ण यात्रेत येणार्या पेट्रोल च्या खर्चाची तरतूद केली. दररोज एका महाविद्यालाला भेट देऊन विद्यार्थ्याशी संवाद साधायचा व खेडेगावात जाऊन मुक्काम करायचा असे ठरविले होते. त्यामुळे खर्च कमी येणार होता आणि मलाही एक वेगळा अनुभव येणार होता. सकाळ झाली कि प्रवासाला सुरवात करायची आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास कुठल्याही गावात जायचे, लोकांशी संवाद साधायचा आणि मंदिरात, शाळेच्या मैदानात, पोलीस स्टेशन जवळ मुक्काम करायचा. जेवण मिळाले तर करायचे नाहीतर उपवास करायचा. असा साधारण उपक्रम असायचा. मी १०८ दिवसात, संपूर्ण २८ राज्यामधून २१००० पेक्षा जास्त प्रवास केला, यामध्ये २०० खेड्यांना भेट दिली, ८० विविध महाविद्यालामध्ये व काही शाळामध्ये मिळून १०६ व्याख्याने दिली, व साधारण ६५०० युवकांना भेटलो, त्याचबरोबर चर्चा केली. या यात्रेमध्ये अनेक चांगले व शिकवण देणारे अनुभव आले, मला विचार करायला, स्वतःबरोबर राहायला वेळ मिळाला, अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली. 
या यात्रेमधून मला अनुभवायला मिळाले कि, " जर आपल्याकडे स्वप्न असेल, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची आपली तयारी असेल, प्रामाणिकपणे आपण त्या स्वप्नांचा पाठपुरावा करत असू तर आपण या जगात काहीही करू शकतो". 
https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEj1HmCIQJfgyMqVgsWYJjs9LdrXtfLwoEHCbG19oVleAFJh0rcE9CmehDqOmFvNn9IKSwRkLFOiruYRp7kUKN-lf1dVipljsKa6J9mA0m83FeZkqSoVHsXCqR1WMqa3TwUU9kO2utMDcg46O8vOq_0sm9O1Cm6YtFuTKcIo=s0-d-e1-ft

आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागणारी उर्जा पर्यटनातून निश्चितपणे मिळते असा माझा अनुभव आहे. पर्यटन हे सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचे साधन आहे. युवकांमध्ये प्रचंड शारीरिक क्षमता असते. उर्जा असते. या उर्जेचा योग्य वापर करून जीवनात यशस्वी होणे सहज शक्य असते. पण योग्य वेळी योग्य मार्ग मिळाला पाहिजे. आपणाला पाहिजे ते करण्यासाठी योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असते. असा योग्य निर्णय घेण्या अगोदर पर्यटन किवा भ्रमंती करणे अत्यंत महत्वाचे ठरते. मानसाला हवी असलेली अनेक प्रश्नाची उत्तरे फिरताना मिळू शकतात.
भ्रमंती करताना माणूस अनेक ठिकाणे बघतो, अनेक व्यक्तींना भेटतो, त्यातून आजूबाजूची परिस्थिती समजते. माणसाचे मन फिरताना अत्यंत क्रियाशील बनते. विविध प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून प्रसंगावधान येते, चातुर्य वाढते. ज्ञानामध्ये भर पडते, व माणूस सक्रीय बनतो.
आपण इतिहासात बघितले तर अनेक थोर लोकांनी प्रवास केलेला आहे, व त्यामुळे ते आयुष्यात प्रचंड यशस्वी झालेले आहे. सक्रीय राजकारणात येण्यागोदर महात्मा गांधीनी संपूर्ण भारत प्रवास केला होता. स्वामी विवेकानंदानी संपूर्ण भारत प्रवास पायी चालत केला होता. समर्थ रामदास व अनेक संत महात्म्यांनी प्रवासाचे महत्व वर्नन केले आहे. त्यांनी प्रवास केला म्हणून ते झाले, मोठे होते म्हणून त्यांनी प्रवास केला नाही. प्रवासाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही हे सत्य आहे. प्रवासामुळे माणसाला आपल्या अंतर्गत शक्तींची जाणीव होते. प्रवासातील अनेक प्रसंगातून खरे शिक्षण मिळते. ज्यांना खरेखुरे जीवन जगायचे असेल त्यांनी भरपूर प्रवास करावा असे माझे मत आहे. प्रवासासारखा गुरु नाही, कारण प्रवासासारखे ज्ञान कोणीही देऊ शकत नाही. सर्वात श्रेष्ट ज्ञान हे अनुभवातून येते, व अनुभव घेण्यासाठी फिरावे लागते.
ज्यांना कोणाला जीवनात प्रचंड यशस्वी व्हायचे असेल त्यांनी खूप प्रवास करावा. पूर्वी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रवास होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक शिष्याला गुरु प्रवासासाठी पाठवत असत. त्या प्रवासाला यात्रा अशी संज्ञा होती. त्या काळात शिष्य विविध तीर्थ क्षेत्रांना भेट देत असे. अनेक विद्वान लोकांबरोबर चर्चा करत असे. विविध प्रकारचे अनुभव घेऊन शिष्य परिपक्व होत असे.
भारतात सध्या युवकांची संख्या खूप आहे. आपला देश हा युवा देश आहे. युवा या शब्दाला उलटे वाचले तर वायू हा शब्द तयार होतो. युवा हा वायू प्रमाणे सारखा फिरत राहिला पाहिजे. ज्ञान मिळवण्यासाठी व मिळवलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी युवकांनी पर्यटन केले पाहिजे. प्रत्येक युवकाने आयुष्यातील किमान एक वर्ष प्रवासासाठी दिले पाहिजे.
तरुणांना फिरायला व इतरांना फिरवायला खूप आवडते, या फिरण्यावर निट लक्ष केंद्रित केले तर या क्षेत्रात उत्तम करिअर सुद्धा करता येते याची माहिती तरुणांनी घ्यावी. नाहीतर आयुष्यभर फक्त रिकामे फिरत राहावे लागते. पर्यटन हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात  कुशल मनुष्य बलाची अत्यंत आवश्यकता आहे, पण अजूनही तरुणांना या क्षेत्रातील करिअर विषयी कमी माहिती आहे.
जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्रात युवकांसाठी अनेक संधी आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी ठराविक ठिकाणी अभ्यास क्रमाची सोय आहे. महागडे अभ्यास क्रम करणे शक्य नसल्यास प्रत्यक्ष अनुभव घेणे उत्तम ठरते. कारण शेवटी पदव्यापेक्षा अनुभव महत्वाचा असतो. कुठल्याही पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमध्ये काम करणे शक्य आहे. पर्यटकांना मार्गदर्शन करणे, त्यांना हव्या असणाऱ्या पूरक सुविधा पुरविणे, यासारखी अनेक कामे करणे शक्य आहे. पर्यटन क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी अनेक संधी आहेत. कमी भांडवलामध्ये सुधा आपण हा व्यवसाय उत्तम चालवू शकतो. पर्यटन हे सेवा क्षेत्रामध्ये येते. येथे उत्तम सेवा देणे अपेक्षित असते.
ज्यांना अभ्यासाची व फिरण्याची आवड आहे, त्यांनी या क्षेत्रात येणे अत्यंत महत्वाचे आहे. संवाद कौशल्य उत्तम असेल, विविध भाषा शिकण्याची तयारी असेल, व नेहमी नवीन गोष्ठी करणे आवडत असेल तर पर्यटन हे एक उत्तम करिअर आहे .
पर्यटन हा अत्यंत विशाल विषय आहे. यामध्ये इतिहास, भूगोल, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, वास्तुरचना शास्त्र, मूर्ती शास्त्र, प्राचीन वास्तू यासारख्या अनेक विषयांचा संबंध येतो. त्यामुळे ज्या कोणाला जीवनाचा चौफेर आनंद घ्यायचा असेल त्यांनी पर्यटन करावे.
मानवी जीवन हा एक प्रवास आहे, आपण सर्व जन प्रवासी आहोत. एका ठराविक वेळेपासून आपण हा प्रवास सुरु केला आहे व एका ठराविक टप्यावर आपणाला थांबायचे आहे, प्रवास अनंत आहे, कधीही न थांबणारा आहे. या आयुष्याचा प्रवास सुंदर करणे व त्याचा आनंद घेणे आपल्या हातात आहे, हा जीवन प्रवास उत्तम होण्यासाठी सदैव चालत राहणे हा उत्तम उपाय आहे. हा जीवन प्रवास समजून घेतला तर जीवन अत्यंत आनंदी होईल. माझ्या अत्यंत आवडत्या कवितेतील काही ओळी जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्व पूर्ण संदेश देतात.
धरती चलती, तारे चलते
अम्बर चलता रहता है
किरणों का उपहार बाटने
सूरज रोज निकालता है
पाव मिले चलने के खातिर
पाव पसारे मत बैठो
जीवन में कुछ करना है तो
हिम्मत हारे मत बैठो
आगे आगे बढ़ाना है तो
मन को मरे मत बैठो.