Thursday, June 28, 2018

युवा दिंडी!



दिंडी किंवा वारी या शब्दांबरोबर पंढरी हे नाव शेकडो वर्षांपासून जोडले गेले आहे. दिंडी हि कधीपासून सुरु झाली? कोणी सुरु केली? का सुरु केली? ईश्वर जळी, स्थळी, पाषाणी ओतप्रोत भरला आहे असे सांगणाऱ्या संतांनी दिंडी का चालू केली असावी? संत तुकाराम, ज्ञानेश्वर हि संत मंडळी दिंडीमध्ये नेमके काय करत असतील? दिंडीमधील त्यांची दिनचर्या काय असेल? दिंडी शेकडो वर्षे अविरतपणे चालू राहते यामागे कारण काय? असे अनेक प्रश्न विचार करायला लावतात.
दिंडी म्हटले कि आपल्यासमोर येते भली मोठी गर्दी! टाळ, मृदंग, वीणा आणि पताका घेऊन ताला-सुरात भजन गात पायी जाणारा भला मोठा जन-समूह! पांडुरंग हे संपूर्ण महाराष्ट्राचे अत्यंत लाडके दैवत. त्याला भेटण्यासाठी लाखो भाविक शेकडो मैलाचा प्रवास पायी करतात.
ज्या संतानी दिंडी किंवा वारी चालू केली ते सर्व युवक होते. समाजाला जागृत करण्यासाठी, सशक्त, श्रद्धावान, धैर्यवान, असे युवक घडविण्यासाठी, भक्ती हि संकल्पना समजून देण्यासाठी, एकमेकांना भेटून विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी, त्यांनी दिंडी हे माध्यम निवडले. पुढील पिढीसाठी काहीतरी सशक्त पर्याय राहावा म्हणून दिंडी हि परंपरा त्यांनी चालू ठेवली. त्यामुळेच शेकडो वर्षांपासून दिंडी आजहि यशस्वीपणे चालू आहे.
त्या काळात दळण-वळणाची साधने वेगळी होती. प्रवासाचे सर्वात सोपे साधन म्हणजे पायी चालणे! पायी चालण्यासाठी सर्वात महत्वाचे असते शारीरिक सामर्थ्य! सशक्त शरीर हे अध्यात्मासाठी अत्यंत महत्वाचे आहे हा संदेश नकळत संतानी समाज मनावर बिम्बविला. पायी चालण्यामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक पातळीवर संतुलन आपोआप साधले जाते. सर्वांना सोयीस्कर व युवकांना आकर्षित करणारी वारी समाजातील सर्व थरांमध्ये लोकप्रिय ठरली.
१५ ते २५ हे मानवी आयुष्यातील अत्यंत महत्वाचे वय आहे. नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, यांसारख्या युवकांनी ऐन तारुण्यातच परमेश्वर समजून घेतला व काव्य, लिखाण केले. त्यामुळे त्यांचे विचार हे तरुणांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, संत साहित्य हे उतारवयात वाचण्यासाठी नाही हे समजणे अत्यंत महत्वाचे आहे. गाथा, ज्ञानेश्वरी व संत साहित्य ऐन तारुण्यात समजणे महत्वाचे आहे. त्यासाठी ऑडीओ-विज्युअल माध्यमाद्वारे संतांचे विचार युवकांपर्यंत पोहचविण्याचे काम युवा दिंडी करत आहे. प्रवासा दरम्यान शाळा, महाविद्यालय यांना भेट देऊन युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. युवकांकडून युवकांना जागृत करण्याचे काम या प्रवासातून होणार आहे.
प्रवासाचे आजचे सोयीस्कर माध्यम म्हणून व साहसी प्रवासाचा अनुभव यावा म्हणून मोटार सायकल चा प्रवास निवडला आहे. प्रवासा दरम्यान राहण्याची व्यवस्था तंबू मध्ये करण्यात येणार आहे. युवा दिंडी चा प्रवास हा थोडासा खडतर असला, तरी जीवनाला नवी दिशा देणारा आहे.  

भारतीय संस्कृती आणि वैज्ञानिक अंधश्रद्धा!

पुरेसा अभ्यास न करता स्वतःला मॉडर्न भासविण्यासाठी उठ-सूट भारतीय सण- परंपरा यावर (पातळी सोडून) टीका करायची सवय अनेकांना लागलेली आहे.
प्रत्येक गोष्ट फक्त विज्ञानाच्या आधारावरच खरी ठरली पाहिजे हा आग्रह कशाला? आणि तसे करायचे ठरले तर किती गोष्टी विज्ञानाच्या आधारावर खऱ्या ठरतील? विज्ञानाला सुद्धा मर्यादा आहेत हे लक्षात घ्या, आणि सर्वच गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या ठरवायच्या असतील, विज्ञान सांगेल तेच खरे आणि बाकी सर्व खोटे असे मानायचे असेल तर त्यास 'वैज्ञानिक अंधश्रद्धा' म्हणावे लागेल. आपणाला एखादी गोष्ट नाही पटत तर नका करू, पण चुकीची माहिती देऊन दिशाभूल का करताय? चुकीच्या गोष्टींवर टीका करत असाल तर अगदी मान्य, पण योग्य गोष्टी चुकीच्या पद्धतीने समजून घेत असाल तर ते आपले अज्ञान आहे हे समजून घ्या!
योग्य असेल तेथे टीका झालीच पाहिजे, चर्चासुद्धा झाली पाहिजे, नवीन बदल आवश्यक असेल तर करायलाही पाहिजे हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. भारतीय संस्कृतीने कायम बदल स्वीकारला आहे, नाविन्याचा शोध घेतला आहे, आणि सर्व विचारप्रवाहांना सामावून घेऊन सहजीवनाचा आदर्श घालून दिला आहे.
एखादि गोष्ट करून लोकांना बरे वाटत असेल, आनंद मिळत असेल, समाजव्यवस्था चांगली राहत असेल, पर्यावरण वाचवले जात असेल, आणि त्यामुळे कोणाचेही, कसलेही नुकसान होत नसेल तर अशा गोष्टी बिनधास्त करा, जीवनाचा आनंद घ्या! कायमच बुद्धी, विज्ञान, तर्कशास्त्र हे वापरलेच पाहिजे असे नाही. जिथे गरज आहे तिथे जरूर वापरा.